सुबाभूळ लागवड आणि तिचे फायदे
सुबाभूळ लागवड ; फायदे प्रचंड
सुबाभळीची मुळे खोलवर जात असल्याने तिला दुष्काळात धक्का बसत नाही शिवाय जास्त पाण्यातही सुबाभूळ तग धरून राहते. सुबाभळीमुळे होणाऱ्या नत्र स्थिरीकरणाने जमिनीची सुपीकता टिकून राहते.
ऑस्ट्रेलियामध्ये १९८६ पर्यंत बीफ उत्पादनासाठी गुरे फक्त गवतावरच वाढवत असत. उत्तम प्रतीच्या गवतात जास्तीत जास्त १० ते १२ टक्के प्रथिने असतात. एका वर्षात ऑस्ट्रेलियन शेतकऱ्यांना जनावरांचे वजन ३०० किलोने वाढायला हवे असते. यासाठी चाऱ्यातले प्रथिनांचे प्रमाण वाढायला हवे. जमिनीत नत्राचे प्रमाण वाढले, की वनस्पतीतील प्रथिने वाढतात.
मात्र मातीमध्ये नत्राचे प्रमाण जगभरात सर्वत्रच कमी आहे आणि यासाठीच सुबाभूळ ही अतिशय महत्त्वाची वनस्पती आहे. एक हेक्टर क्षेत्रात सुबाभूळ लावून त्यासोबत रायझोबियम जिवाणूंचे कल्चर टाकले की वर्षाला ७५ किलो नत्र जमिनीत निर्माण होतो.
एवढा नत्र निर्माण होण्यासाठी एरवी १५० किलो युरिया वापरावा लागतो. जमिनीत नत्र स्थिरीकरण झाल्यामुळे सुबाभळीच्या पाल्यामध्ये २० ते २५ टक्के प्रथिने असतात.
सुबाभळीच्या नवीन जाती विकसित झाल्यानंतर आता ऑस्ट्रेलियामध्ये जनावरांच्या चाऱ्यात ४४ टक्के सुबाभूळ आणि ५६ टक्के अंजन गवत असते. पूर्वी नुसत्या गवतावर पोसलेल्या जनावरांचे वजन एका वर्षात १४० ते १९० किलोने वाढायचे. सुबाभूळ आमि गवत खाऊन वर्षात २५० ते ३०० किलोने वजन वाढते. शिवाय सुबाभूळ खाऊन जनावरे फुगत नाहीत.
लसूण घासासारख्या प्रथिनांचे प्रमाण अधिक असणाऱ्या वनस्पती खाऊन जनावरांना हमखास पोटफुगी होते. ऑस्ट्रेलियात जनावरांना धान्य आणि पेंडही देतात. मात्र धान्य खायला घालून मिळते तेवढ्या गुणवत्तेचे मांस सुबाभूळ व गवताच्या खुराकानेही मिळते. धान्य हे मनुष्याचे अन्न असल्याने ते जनावरांना खायला देऊ नये असे मांस-विरोधक लोकांचे म्हणणे असते.
धान्याची खरे तर जनावरांना गरजच नाही. सुबाभूळ हा त्यांच्यासाठी संपूर्ण वर्षभर मिळणारा उत्तम प्रतीचा चारा आहे. उन्हाळ्यात गवत वाळून गेले, की दुधाचे उत्पन्न कमी होते, तर पावसाळ्यात ते गरजेपेक्षा जास्त होते. सुबाभूळ चारा म्हणून दिले तर वर्षभर दूध उत्पादनात सातत्य राहते. सुबाभळीची लागवड केल्यावर तिची पुरेशी वाढ होण्यासाठी वर्षभराचा कालावधी लागतो, त्यामुळे बहुतेक सर्व खर्च पहिल्या वर्षात होतो.
नंतर मात्र काहीच खर्च करावा लागत नाही व नफा वाढत जातो. पहिल्या वर्षी हेक्टरी ७२ ऑस्ट्रेलियन डॉलर नफा मिळवून देणाऱ्या सुबाभळीपासून दुसऱ्या वर्षी हेक्टरी ३६७ ऑस्ट्रेलियन डॉलर इतका नफा होतो. लागवडीनंतर साधारण सातव्या वर्षी गुंतवलेली सर्व रक्कम परत मिळते. मात्र २५-३० वर्षांनंतर सुबाभळीची उत्पादकता घसरते आणि उत्पादनात सातत्य राहावे म्हणून त्या जमिनीत विशेषतः स्फुरद, गंधक व जस्त अशी पोषक द्रव्ये मिसळावी लागतात.
सुबाभळीला पहिल्या २-३ महिन्यानंतर पाला येतो; परंतु तो लगेच काढायला सुरवात केल्यास झाडाची वाढ नीट होत नाही, तसेच प्रति झाड उत्पन्नही कमी होते. संशोधन सांगते, की सुबाभूळ एक ते दीड मीटर उंचीची होईपर्यंत शक्यतो पाला काढायला सुरवात करू नये. सहा महिने ते एक वर्षानंतर पाला काढण्यास सुरवात केली तर प्रत्येक झाडामागे दर ३ ते ४ महिन्यांनी एक किलो पाला मिळतो. हेच जर दोन वर्षांनंतर केले तर प्रत्येक झाडामागे दर कापणीला तीन किलो पाला मिळतो. पाल्याच्या दोन काढण्यांमध्ये अधिक अंतर असेल तर ते लाकूड उत्पादनास पोषक असते व कमी अंतर असल्यास पाला उत्पादन जास्त मिळते.
सुबाभळीचे पर्यावरणीय फायदेही अनेक आहेत. या वनस्पतीची मुळे खोलवर जात असल्याने तिला दुष्काळात धक्का बसत नाही शिवाय जास्त पाण्यातही सुबाभूळ तग धरून राहते. मात्र दलदलीत सुबाभळीची वाढ चांगली होत नाही. सुबाभळीमुळे होणाऱ्या नत्र स्थिरीकरणाने जमिनीची सुपीकता टिकून राहते. सुबाभळीचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ती जमिनीत पाणी टिकवून ठेवायला मदत करते, त्यामुळे जमीन क्षारपड होत नाही.
आपल्याकडे पाणी अडवा, पाणी जिरवा आणि ते पाणी पुन्हा उपसा करून उसाला द्या असा प्रकार चाललेला असतो. सुबाभूळ लागवडीमुळे नैसर्गिकरीत्याच पाणी अडवले जाते आणि तिथेच टिकून राहते. ऑस्ट्रेलियामध्ये सुबाभूळ लागवड केलेल्या २२० हेक्टर क्षारयुक्त जमीन क्षेत्रात १००० मिमी पावसानंतरही जमिनी क्षारपड झाल्या नाहीत असे आढळून आले आहे.
सर्व प्रकारच्या हवामानात सुबाभूळ चांगली वाढते. हिमालय भागातील संशोधनात असे दिसून आले, की सुबाभूळ लागवडीमुळे तीन मीटरपर्यंत खोल असलेल्या भूजलाचा वापर झाला. अन्यथा, हा आकडा दीड मीटर इतकाच होता.
जगभर जंगल जमिनींचे शेत जमिनींमध्ये रूपांतर केले गेले आहे. पाणी धरून ठेवण्याची पिकांची क्षमता कमी असल्याने त्यांना दिलेले बरेचसे पाणी वाहून जाते आणि जमिनी कोरड्या होऊन क्षारपड होतात. त्याच जमिनींवर मोठ्या प्रमाणात सुबाभूळ लागवड करण्यात आली तेव्हा असे दिसून आले की जंगलाखाली असताना जमिनीची जी परिस्थिती होती तीच सुबाभळीच्या लागवडीमुळे पुन्हा तयार होते.
सुबाभूळ जमिनीचा जलावर्तन समतोल टिकवून ठेवते, त्यामुळे पाण्याचा खोल निचरा होत नाही आणि जमिनी क्षारपड होण्यापासून त्यांचा बचाव होतो. भारतात जमिनीची नांगरट करणे थांबवले तर जमीन सुधारायला १०-२० वर्षे लागतात. सुबाभूळ लागवडीने ही परिस्थिती दोन वर्षांत सुधारू शकते. मात्र त्यासाठी संपूर्ण क्षेत्रात सुबाभळीची लागवड करावी लागेल.
संशोधक असेही सांगतात, की जंगलांमध्ये नैसर्गिकरीत्या सुबाभळीचे प्रमाण मूळ जितके होते तेवढेच लागण करून राखणे महत्त्वाते आहे. हे प्रमाण अति झाले तर ते पर्यावरणाला पोषक नाही. अर्थात निसगीत कोणतीही गोष्ट अति झाली तर तिचे दुष्परिणाम असतातच.
पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यासाठी सुबाभूळ निश्चितच फायद्याची आहे. मशागत आणि खतांची गरज नाही. जमिनीसाठी पोषक, जनावरांसाठी उत्तम आणि कमी खर्चिक अशा सर्व दृष्टीने सुबाभूळ उजवी ठरते. बियांमुळे होणाऱ्या उपद्रवामुळे सध्या सुबाभूळ लागवड खूपच कमी आहे.
मात्र सुधारित वाण जसजसे बाजारात येतील तसा हा वापर वाढेल व अधिकाधिक शेतजमीन सुबाभूळ लागवडीखाली येईल, अशी आशा आहे.
-
वसंत चरमळ
-
शेतकऱ्यांच्या माहितीस्तव साप्ताहिक कृषकोन्नती वरून साभार…
सुबाभूळ एक वर्षाचे झाले आहे . कुठले आंतरपीक घेवू शकतो का?
आंतरपीक : लागवडी नंतर पहिले सहा महीने म्हणजे एक हंगाम सर्व अंतरपिक घेता येवू शकतात मात्र त्या नंतर सुबाभळीची वाढ अधिक झाल्याने सावलीत इतर पीक येत नाहीत.