सेंद्रिय शेतीला पूरक असे कोंबडी खत…
कोंबडी खत म्हणजे काय ?
कोंबड्यांच्या लिटरसाठी वापरलेला लाकडाचा भुस्सा, कोंबड्यांची विष्ठा, साळीचा भुस्सा, शेंगाची टरफले इ. सर्व घटक कुजल्यानंतर तयार झालेला पदार्थ म्हणजे कोंबडी खत. कोंबडी खताची प्रत ही कोंबडीची जात, वापरण्यात आलेले लिटरचे साहित्य, कोंबडी खाद्य, जागा, पाण्याचा वापर यांसारख्या घटकांवर अवलंबून असते. सेंद्रिय खत असो वा पोल्ट्री खत किंवा पिकांची टाकाऊ पाने वा अवशेष असोत, त्यांचा वापर केल्याने मातीची भौतिक, रासायनिक व जैविक क्षमता सुधारते.
कोंबडी खतातील घटक.
कोंबडी खतामध्ये तेरा अन्नद्रव्ये असतात. त्यामध्ये नत्र व स्फुरद जास्त प्रमाणात असतं. कोंबडीखतातील नत्र हे अमोनिया, नायट्रेट, यूरिक ?सिड याप्रमाणात आढळते. मुख्य अन्नद्र व्यतिरिक्त कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, सोडियम, बोरन, झिंक, कॉपर, इत्यादी अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. सुकवलेल्या एक टन केज पोल्ट्रीखताचे मूल्य हे १०० किलो युरिया, १५० किलो सुपरफॉस्फेट, ५० किलो पोटॅश, १२५ किलो कॅल्शिअम कार्बोनेट, ३० किलो गंधक, दहा किलो मॅग्नेशिअमसल्फेट, पाच किलो फेरस सल्फेट एक किलो मॅगेनीजसल्फेट, झिंक सल्फेट आदी व अन्य अंशात्मक घटकांएवढे असते.
चांगल्या खताचे गुणधर्म
१. खताचा रंग भुरकट, तपकिरी, काळपट व वास मातकट असावा.
२. खताचा सामू ६.५ – ७.५ दरम्यान असावा.
३. कणांचा आकार ५ ते १० मिमी असावा.
४. कर्बनत्र गुणोत्तर १:१० ते १:२० दरम्यानअसावा.
५. जलधारणा शक्ती ३० टक्क्यांपेक्षा जास्त असावी.
खत तयार करण्याची पद्धत
सेंद्रिय शेतीला पुरक कोंबडी खताचे महत्त्व
१. पोल्ट्री शेडमधील लिटर शेडच्या बाहेर काढल्यानंतर त्याचे व्यवस्थित थर लावावेत. एक टन कोंबडी लिटरसाठी दोन किलो कंपोस्टजिवाणू संवर्धक मिसळावे. पुरेसा ओलावा (३० ते ४० टक्के) राहील एवढे पाणी शिंपडावे.
२. खताच्या ढिगाची एक महिन्याच्या अंतराने २ ते ३ वेळा नियमित चाळणी करावी.
३. खताच्या ढिगाचे तापमान ४० ते ५० अंश सेल्सिअस एवढे राखावे.
४. चांगल्या गुणवत्तेचे कोंबडी खत तयार होण्यास पाच महिन्यांचा कालावधी लागतो.
५. सध्या कोंबडी खत हे व्यावसायिक स्वरूपातही तयार करतात. कोंबडी खताच्या पॅलेट ५ ते २५ किलोच्या बॅगेत मिळतात.
कोंबडी खत केव्हा वापरावे
१. पेरणीपूर्वी एक ते दीड महिना अगोदर मशागतीच्यावेळी कोंबडीखत जमिनीत मिसळावे. जमीन व पीकलागवडी नुसार प्रति एकरी ५ ते २० टन खताचा वापर करावा.
२. मशागत झाल्यानंतर कुळवाची पाळीद्यावी मात्र ताजे कोंबडीखत उभ्यापिकांत जमिनीत मिसळू नये.
३. उभ्या पिकांत कोंबडीखत जमिनीत मिसळण्यापूर्वी प्रथम त्यावर एक महिना पाणी मारून किंवा थंड होऊ द्यावे म्हणजे कोंबडीखताचे कर्बः नत्र गुणोत्तर कमी होऊन त्यातील अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध होतात.
४. कोंबड्यांची विष्ठा, मूत्र, गव्हांडा किंवा कोंबडीखत वापरावे.भाताच्या तुसावर पडून खत तयार होते, त्यामुळे ताज्या कोंबडीखताचे कर्ब: नत्र गुणोत्तर जास्त असते. असे खत उभ्यापिकांत जमिनीत मिसळताना ओलावा असला पाहिजे.
५. जमिनीत पुरेसा ओलावा नसेल तर पीक पिवळे पडते, त्यामुळे ताजे कोंबडीखत थेट पिकांसाठी वापरू नये. उभ्यापिकांत पूर्ण कुजलेले
६. हलक्या, जास्त निचऱ्याच्या लालसर तांबड्या जमिनीत कोंबडीखतातील नत्र, स्फुरद, पालाश अन्नद्रव्यांव्यतिरिक्त कॅल्शिअम, मॅग्नेशिअम व सोडिअमचे प्रमाण जमिनीत मिसळले जाऊन पिकांना उपलब्ध होतात. जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. तणांचा शेणखतासारखा प्रादुर्भाव कोंबडीखतातून होत नाही.
*रासायनिक खतांच्या बेसुमार वापराने जमिनींची प्रति बिघडत चालली आहे. सेंद्रिय खतांचा वापर वाढताना कोंबडी खताचे मूल्य समजून घेणे गरजेचे आहे. भारतात सुमारे ६.२५ ते आठ दशलक्ष टन कोंबडी खताचे वार्षिक उत्पादन होते. सध्या रासायनिक खतांच्या तसेच पाण्याच्या अति वापराने जमिनीची सुपीकता कमी होत चाललेली आहे. अशा परिस्थितीत सेंद्रिय खतांचा वापर करणे गरजेचे झाले आहे. चेन्नई येथील तमिळनाडू पशुवैद्यक व जनावरे शास्त्र विद्यापीठातील कुक्कुट पालन शास्त्र (पोल्ट्री) विषयाचे माजी प्रमुख डॉ. डी. नरहरी म्हणतात, की ज्यावेळी पिके एखाद्या अन्नद्रव्याची कमतरता दाखवू लागतात त्याच वेळी शेतकरी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करतात. सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर पुरेशा प्रमाणात केला नाही तर पीक उत्पादनावर त्याचा परिणाम होतो. विविध संशोधन तसेच जागतिक बँक व आशियायी विकास बँकेने केलेल्या सर्वेक्षणामध्ये आढळलेल्या, सेंद्रिय खतांच्या माध्यमातून सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण मातीत वाढवले तर केवळ कमतरता कमी होण्यावरच त्याचा परिणाम दिसून येणार नाही, तर अन्नसाखळीद्वारे मनुष्य तसेच जनावरे यांच्या शरीरातही त्यांचा अनुकूल प्रभाव दिसून येण्यासाठी मदत होईल. जेशेतकरी रासायनिक खतांच्या वापरावर भर देतात ते देखील आपल्याशेतात सुरवातीचे ‘डोस’ म्हणून गांडूळ खत किंवा शेणखताचा वापर करतात. ही अनेक वर्षांपूर्वीची पद्धत आहे.*
सारांश – रासायनिक खतांच्या अति वापरामुळे जमिनीची सुपीकता कमी होत असून परिणामी पिकाची उत्पादन कमी होते. जमिनींचा पोत सुधारून जमिनीची सुपीकता तसेच पिकाचे उत्पादन वाढवण्याची सेंद्रिय खताचा वापर करणे आवश्यक आहे. सेंद्रियखतामध्ये कोंबडी खत हा उत्तम पर्याय आहे. कोंबडी खत वापरल्याने मातीची भौतिक, रासायनिक व जैविक क्षमता सुधारते. या मध्ये मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य असल्यामुळे पिकाचे उत्पादन वाढते. जमिनीची सुपीकता घटत चालल्याचे मुख्य उदाहरण पाहण्यास मिळते ते ऊस शेतात. या पिकामध्ये एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन संकल्पना राबवणे गरजेचे आहे. शेणखत, कंपोस्ट किंवा प्रेसमडयांचा वापर त्यासाठी महत्त्वाचा आहे. तागासारखे हिरवळीचे पीक आंतरपीक म्हणून घेऊन लागवडीनंतर सुमारे ३० ते ४५ दिवसांनंतरत्याचा वापर खत म्हणून करण्याची पद्धत आता अनेक शेतकरी वापरू लागले आहेत. उसाच्या पानांमध्ये लोह किंवा जस्ता ची कमतरता आढळल्यास फेरससल्फेट व झिंक सल्फेटचा वापर करणे गरजेचे आहे. अझोस्पिरीलम आणि फॉस्फोबॅक्टेरियायांचा वापरही तितकाच महत्त्वाचा आहे. मातीचा सामूही नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे.
१.शुभांगी निवृत्ती बनसोडे, पदव्युत्तर पदवी विद्यार्थी, पशु संवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, कृषि महाविद्यालय, नागपूर
२.डॉ. अभिजित मोटघरे, सहायक प्राध्यापक, पशुविज्ञान, पशु संवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, कृषि महाविद्यालय, नागपूर
३.विद्याधर बोरकर, आचार्य पदवी विद्यार्थी पशु संवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, पदव्युत्तर महाविद्यालय, म.फु.कृ.वि, राहुरी
*शेतकऱ्यांच्या माहितीस्तव साप्ताहिक कृषकोन्नती वरून साभार…*
शेतीला एक फायदेशीर व भरवशाचा जोडधंदा: शेतमाल प्रक्रिया उद्योग
5 thoughts on “सेंद्रिय शेतीला पूरक असे कोंबडी खत…”