तण व पाणी व्यवस्थापनासाठी मल्चिंग पेपरचा वापर

तण व पाणी व्यवस्थापनासाठी मल्चिंग पेपरचा वापर

mulching paper

१) पॉलिथिन कागद आच्छादनासाठी वापरल्याने पिकासोबत स्पर्धा करणारी अनेक तणे नियंत्रित राहतात, त्यामुळे पिकास दिलेली खते भाजीपाला रोपांच्या वाढीसाठी उपलब्ध होतात.

२) पॉलिथिन कागदाच्या आच्छादनामुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी होते, त्यामुळे कमी पाण्यातसुद्धा उन्हाळ्यात पिकांचे भरघोस उत्पादन मिळते.

३) आच्छादन ठिबक सिंचनासोबत वापरणे जरुरीचे आहे. पॉलिथिन कागदाचे आच्छादन केल्यास ठिबक लॅटरलचे आयुष्यमान वाढते.

४) रासायनिक खते उघड्या जमिनीत दिल्यास त्यातील बराच मोठा अंश वातावरणाशी संपर्क आल्याने जमिनीतून नष्ट होतो, त्यामुळे जमिनीत दिलेल्या खताचे अपेक्षित परिणाम पिकावर दिसत नाहीत. पॉलिथिन आच्छादनामुळे अन्नद्रव्यांचा स कमी होतो.

५) उन्हाळ्यामध्ये दिवसा जमिनीचे तापमान झपाट्याने वाढते. अनेकदा पिकाच्या मुळ्यांना ते सोसत नाही. हे टाळण्यासाठी पॉलिथिन कागदाचे आच्छादन उपयोगी ठरते.

६) हिवाळ्यात जमिनीचे तापमान विशेषतः रात्रीच्या वेळी खूप खाली जाते, त्यामुळे अनेक सूक्ष्म अन्नद्रव्यांचे शोषण होत नाही, पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. बऱ्याचदा फळांचा आकार बिघडतो.

७) पॉलिथिन कागदाच्या आच्छादनामुळे जमिनीचे तापमान नियंत्रित राहते. उन्हाळ्यात ओलावा टिकून राहतो.

८) आच्छादनामुळे तापमान, अति आर्द्रता नियंत्रित राहिल्यामुळे पीकवाढीला फायदा होतो.

९) आच्छादन वापरल्याने फळांचा मातीशी संपर्क न आल्याने फळांची प्रत सुधारते. फळांचा आकर्षकपणा टिकून राहून भाव चांगला मिळतो.

१०) टोमॅटोमध्ये आच्छादन वापरल्यास मूळकूज, खोडकूज, पानांवरील करपा रोगांचा प्रादुर्भाव कमी दिसून आला आहे.

११) पिकास दिलेली भर, उंच गादीवाफ्यांचा अवलंब आणि त्यासोबत ठिबक सिंचनाची व्यवस्था यामुळे शोषक मुळ्यांच्या परिसरातील जास्त झालेले पाणी शेतातून बाहेर काढण्यास सुलभ होते. परिणामी रोग नियंत्रित राहतात. काही किडींचे अवशेष गळून पडलेल्या फळांवाटे व पानांवाटे जमिनीत जातात. तेथे काही काळ सुप्त अवस्थेत राहून पुन्हा पिकावर प्रादुर्भावकरतात. पॉलिथिन कागदाचे आच्छादन केल्यास किडींच्या जमिनीतील वाढीस अटकाव होऊन फळांच्या विक्रीयोग्य उत्पादनात वाढ होते.

१२) पॉलिथिन मल्चिंग केल्यामुळे पांढरी माशी, लाल कोळी यांचाही प्रादुर्भाव कमी होतो.

१३) पॉलिथिन आच्छादनामुळे माती मोकळी, भुसभुशीत राहते, त्यामुळे मुळांभोवती हवेशीरपणा वाढतो; तसेच उपयुक्त सूक्ष्म तण व पाणी व्यवस्थापनासाठी मल्चिंग पेपरचा वापर जिवाणूंची वाढ मोठ्या प्रमाणावर होते.

१४) आंतरमशागत करताना पिकाची मुळे बऱ्याचदा तुटतात. पॉलिथिन मल्चिंगमुळे मुळांची वाढ कागदाखालीच होते, त्यामुळे आंतरमशागत करताना मुळे तुटत नाहीत.

१५) आच्छादनाचा फायदा उत्पादनवाढीमध्येही दिसून आला आहे.

mulchig paper

प्रकार आकार (मी.) (लांबी व रुंदी)  पिके
रेड लेबल ४०० मी. x १.२ मी. कलिंगड, खरबूज, काकडी आणि स्ट्रॉबेरी
ऑरेंज लेबल  ४०० मी. x १.२ मी.  पपई व केळी पीक आणि कलिंगड खरबुजाचे दुहेरी पीक
ब्ल्यु लेबल ४०० मी. x ०.९ मी. काकडी, टोमॅटो, मिरची, ढोबळी मिरची व इतर वेलवर्गीय पिके आणि कपाशी
यलो लेबल ४०० मी. x ०.९ मी. सर्व वेलवर्गीय पिके
ग्रीन लेबल २००  मी. x १.५ मी. डाळिंब, संत्री, पेरू आणि इतर फळबागा
व्हाईट लेबल ४०० मी. x १.२ मी. कलिंगड आणि खरबुजाचे दुहेरी पीक

 

भाजीपाला पिकांसाठी मल्चिंग पेपरचा वापर –

बाजारामध्ये अनेक प्रकारचे मल्चिंग पेपर उपलब्ध आहेत. यापैकी एक मीटर रुंदी असणारे चंदेरी रंगाचे प्लॅस्टिक पेपर निवडावेत. मल्चिंग पेपरची जाडी २५ किंवा ३० मायक्रॉन एवढी असावी. मल्चिंग पेपर साधारणतः ४०० मीटर लांबीमध्ये उपलब्ध असतात.

लागवडी अगोदर माती परीक्षण आवश्यक आहे. त्यानुसार लागवडपूर्व खताची मात्रा ठरवावी. जमिनीची नांगरट करून माती भुसभुशीत करावी. तीन फूट रुंदीचे गादीवाफे तयार करावेत. पिकाच्या दोन ओळींमध्ये पाच फूट आणि दोन रोपांमध्ये दोन ते अडीच फूट जातीनुसार लागवड अंतर ठेवले जाते.

साधारणतः प्रति एकरी ४०० मीटर लांबीचे एक याप्रमाणे पाच ते सहा बंडल पॉलिथिन आच्छादन कागद लागतो. पॉलिथिन कागद अंथरण्यापूर्वी गादीवाफ्यावरील मातीमध्ये शेणखत व रासायनिक खतांची मात्रा द्यावी लागते. गादीवाफा निर्जंतुक करून घ्यावा.

गादी वाफ्यावर आच्छादन कागद अंथरून दोन्ही बाजूने तो मातीमध्ये गाडून टाकावा. कागद अंथरण्यापूर्वी योग्य अंतरावर ड्रीपर असणारी लॅटरल अंथरणे गरजेचे असते.

पॉलिथिन मल्चिंगवर दोन ते अडीच फुटांवर नऊ ते दहा सें.मी. व्यासाची छिद्रे पाडून घ्यावीत, जेणेकरून ट्रेमध्ये तयार केलेली रोपे त्यामध्ये लावता येतील.

 

mulching

मल्चिंगसाठी गादीवाफे तयार करणे उभी आडवी नांगरट करून माती भुसभुशीत करावी. मोठी ढेकळे फोडून घ्यावीत. अणकुचीदार दगड गोटे किंवा मागील पिकाची धसकटे वेचून बाहेर काढावीत. रोटाव्हेटर किंवा कुळवाच्या मदतीने गादी वाफे तीन ते चार फूट अंतरावर तयार करावे लागतात, जेणेकरून पिकांच्या दोन ओळींमधील अंतर पाच फूट राहते.
अशा गादीवाफ्यावर एकरी १० ते १५ टन चांगले कुजलेले शेणखत पसरावे, त्यामध्ये ५०० किलो निंबोळी पेंड आणि एस.एस.बी., अॅझेटोबॅक्टर, ट्रायकोडर्मा प्रत्येकी सहा किलो मातीत मिसळावे. माती परीक्षण करून लागवडपूर्व द्यावयाची खतमात्रा ठरवावी. खतमात्रा देऊन गादीवाफे लागवडीस तयार करावेत.
मल्चिंग पेपर गादीवाफ्यावर पसरण्यापूर्वी ठिबकची लॅटरल अगोदर टाकून घ्यावी, त्यानंतर मल्चिंग पेपर पसरावा. कागदाच्या दोन्ही बाजू मातीमध्ये गाडून घ्याव्यात. धातूच्या धारदार कडा असणाऱ्या ग्लासचा उपयोग करून त्रिकोणी पद्धतीने दीड फुटावर छिद्रे तयार करावीत. गरज भासल्यास ग्लास विस्तवावर गरम करून छिद्र पाडावे.
छिद्राचा व्यास तीन इंचापर्यंत असावा. या छिद्रांमध्ये रोपांची लागवड करावी. आंतरमशागतीची कामे करताना, फळांची काढणी करताना पेपर फाटणार नाही याची काळजी घ्यावी.
mulching paper instalation
*पाण्याचा तुटवडा, तणांच्या वाढीमुळे होणारे नुकसान या बाबींचा विचार करता भाजीपाल्यामध्ये आच्छादनाचा वापर आवश्यक आहे. आच्छादनासाठी वाळलेला पालापाचोळा, गव्हाचे काड, लाकडाचा भुस्सा, भाताचे तूस, उसाच्या पाचटाचा वापर केला जातो. त्याबरोबर आता पॉलिथिन कागदाचासुद्धा वापर वाढला आहे. भाजीपाल्याच्या चांगल्या उत्पादनासाठी पॉलिथिन आच्छादनाचा वापर फायदेशीर दिसून आला आहे.*

श्री गजानन ज. तुपकर विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या), कृषि विज्ञान केंद्र, अकोला

शेतकऱ्यांच्या माहितीस्तव साप्ताहिक कृषकोन्नती वरून साभार…

krushiwarta

कृषी पर्यटनातून शेतीला जोडव्यवसाय/जोडधंदा

सेंद्रिय शेतीला पूरक असे कोंबडी खत…

 

शेतीला एक फायदेशीर व भरवशाचा जोडधंदा: शेतमाल प्रक्रिया उद्योग

 

जिल्हानिहाय आजचे बाजारभाव

2 thoughts on “तण व पाणी व्यवस्थापनासाठी मल्चिंग पेपरचा वापर”

Leave a Comment

close
Thanks !

Thanks for sharing this, you are awesome !