कृषी पर्यटनातून शेतीला जोडव्यवसाय / जोडधंदा
देशातील कृषी आणि ग्रामीण पर्यटनाची सुरुवात महाराष्ट्र राज्यापासूनच झाली. पर्यटन क्षेत्रात कृषी पर्यटन ही वेगाने विकसित होणारी शाखा असल्याने अनेक प्रयोगशील शेतकरी कृषी पर्यटनाकडे वळले आहेत. निसर्गसंपन्न असलेला कोल्हापूर जिल्हा ही कृषी पर्यटनात आपली वेगळी ओळख निर्माण करू लागला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कृषी पर्यटन केंद्राला भेटी देणाऱ्या पर्यटकांची संख्या सातत्याने वाढत असून देश विदेशातील पर्यटकांनीही कोल्हापूर जिल्हयातील कृषी पर्यटन केंद्रावर येऊन पाहुणचार घेतला आहे. शेतकऱ्यांना शेतीबरोबर शेतीपूरक जोडधंदा म्हणून चांगले उत्पन्न मिळवून देण्यात हिरव्याकंच कृषी पर्यटनाची भर पडत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील बाराही तालुक्यातील भौगोलिक रचना कृषी पर्यटनासाठी पूरक असल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील कृषी पर्यटनाला पर्यटकाकडून चांगलाच प्रतिसाद मिळू लागला आहे. घनदाट वृक्षराजी, वाघ, बिबटया, हत्ती, गवे, अस्वलांसह विविध प्रकारचे पशुपक्षी. फुलपाखरे, बेडूक, खेकडे, माशांच्या दुर्मीळ प्रजाती. वाऱ्यावर डोलणारी खाचरातील भात शेती. फुललेले उसाचे मळयासह शहराबाहेरील निसर्गरम्य कोल्हापूर जिल्हा बघण्यासाठी शरदाचे चांदणे असो की फुलणारा वसंत .. सर्वच ऋतूत पर्यटकांची कृषी पर्यटनाला पसंती मिळू लागली आहे.
कृषी पर्यटनाचा म्हणून खास गावरान मेव्याचा आनंद असतो. बैलगाडीतून रपेट मारणे, प्रत्यक्ष शेतात काम करण्याचा अनुभव घेणे यातून एक वेगळाच आनंद मिळतो. पावसाळयात गुडघाभर चिखलात रोप लावण कशी केली जात असेल याचे कुतूहल असते. विशेष म्हणजे शहरी बाबू आणि बाईसाहेबांना चिखलात माखून घेण्याची खुमारी चाखायची असल्याने काही कृषी पर्यटन केंद्रावर चिखल महोत्सवाचेही आयोजन केले जाते. भात कापणी, मळणी, भाताला वारे देणे, रास तयार करणे, ती पोत्यात भरणे, बैलगाडीतून आणलेले धान्य घरात घेताना घरच्या सुहासिनीकडून बैलांचे पूजन करणे ही संस्कृती पाहता येत असल्याने कृषी पर्यटन केंद्रावर सहकुटुंब येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत आहे. याशिवाय झाडावर चढून हंगामात झाडावरील फळे काढणे, शेतातील घरात मुक्काम करणे, जेवणाचा आस्वाद घेणे यातून पर्यटकाला शहरी, धकाधकीच्या जीवनापासून काहीसा आराम आणि मनःशांती मिळत असल्याच्या सुखद प्रतिक्रिया आहेत.
*अलीकडे पर्यटनाच्या कक्षा रुंदावत चालल्या आहेत. कृषी पर्यटन हे लोकांना गावगाड्यात येण्यास भाग पाडत आहे. शेती आणि शेतीशी संबंधित उपक्रम पाहण्यासाठी केलेला प्रवास म्हणजे कृषी पर्यटन मानले जाते. यातून कृषी संस्कृतीची ओळख होते. कोणत्या पिकांना कोणती माती योग्य, तिचा दर्जा, शेतकरी पिकांचे करीत असलेले नियोजन, काळजी या उपक्रमांचे अवलोकन केले जाते. याचा अधिक विस्तार व्हावा यासाठी शासनाचेही प्रयत्न चालू आहेत. यामुळेच कोल्हापूरसारख्या कृषी प्रधान जिल्ह्यात कृषी पर्यटन बहरत चालले आहे. शहरी लोकांना ग्रामीण संस्कृतीचा विसर पडला चालला आहे. त्यांना सावध करण्याचे काम कृषी पर्यटन करीत आहे. ग्रामीण कृषी संस्कृतीचे दर्शन यांना या माध्यमातून होऊ लागली आहे. जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठीच कृषी पर्यटनाची गरज बाढू लागली आहे. याचमुळे की काय महात्मा गांधी यांनी ‘ खेडय़ाकडे चला’ हा सल्ला दिला असावा.*
शेतकऱ्यांना अर्थार्जनाची संधी:
कृषी पर्यटन हा शहरी आणि ग्रामीण जनतेमध्ये सेतूप्रमाणे कार्य करण्यासोबत शेतकऱ्याला अर्थार्जनाची संधी मिळवून देणारा व्यवसाय आहे. संपूर्ण शहरी अशा मुला- माणसांपर्यंत ग्रामीण जीवनातील गोडवा, जुने खेळ पोचवण्यामध्ये या व्यवसायाने मोलाची कामगिरी पार पाडताना दिसतो. जणू संस्कृती, परंपरा याचे जतन केले जाते. राज्यामध्ये स्वयंप्रेरणेतून राज्यभरात ३२८ ठिकाणी कृषी पर्यटन केंद्र उभी राहिली आहेत. तर कोल्हापूर जिल्ह्यातील ५० हून अधिक शेतकऱ्यांनी पर्यटन विभागाकडे अर्ज केले असून त्यापैकी २२ कृषी पर्यटन केंद्राना मंजुरी मिळून त्या ठिकणी कृषी पर्यटन सुरू झाले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयाकडे नोंदणी करून राज्य शासनाचे अधिकृत कृषी पर्यटन केंद्र सुरू केली आहेत, त्यामध्ये पारंपरिक शेती करणाऱ्यांसह आधुनिक यंत्रणेचा वापर करत शेती करणाऱ्या उच्चशिक्षितांचाही समावेश आहे. यामध्ये शाहूवाडी तालुक्यातील आंबा येथे प्रकृती कृषी व गो पर्यटन व संजय जाधव कृषी पर्यटन, पन्हाळा तालुक्यातील बांदिवडे येथे देवगिरी फार्म कृषी पर्यटन, माले येथे आठवण मातीची कृषी पर्यटन, गगनबावडा तालुक्यातील अनबेला, ॲग्री इको व्हॅली व नीलकंठ पंडित यांचं काजवा कृषी पर्यटन, करवीर तालुक्यातील पैस अॅग्रो, रॉयल अॅग्रो, व्यंकटेश ॲग्रो, कृषीराज ॲग्रो, आजरा तालुक्यातील प्रा. अनिल मगर आणि आनंद पाटील यांचे चित्री कृषी पर्यटन केंद्राचा प्रामुखाने उल्लेख करावा लागेल.
कोल्हापूर जिल्ह्यातील आंबा येथील प्रकृती कृषी व गो पर्यटन, आजरा येथील चित्री व बांदीवडे येथील देवगिरी फार्मवर अभिनव सेंद्रिय शेती बरोबर फळबाग लागवड, दुर्मीळ वनस्पतींचे संवर्धन, गोशाळा, शेळी पालन, देशी कुकुटपालन, इको आणि कृषी पर्यटन, नर्सरी, सेंद्रिय शेतीमालाची विक्री, प्रक्रिया, चिखल महोत्सव, कारवी महोत्सव, वर्षां महोत्सव, काजवा महोत्सव, निसर्ग भ्रमंती, जंगल भ्रमंती असे अनेक उपक्रम राबवण्यात येत आहोत. देवगिरी फार्मवर एकच पीक न घेता विविध पीक पद्धत येणाऱ्या पर्यटकांना बघायला मिळतात. या ठिकाणी दुर्मीळ झालेल्या भाताचे अनेक वाण जतन करण्यात आले आहेत.
सांघिक प्रयत्न
दोन – तीन वर्षांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील कृषी पर्यटन केंद्राची सुरुवात केली. चित्री, देवगिरी व आठवण मातीची या कृषी पर्यटन केंद्रावर येणाऱ्या पर्यटकांना राहण्यासाठी दगड, माती, लाकुड आणि कारवीचा वापर करून पर्यावरणपूरक घरे बांधली आहेत. घराच्या भिंतीना रंग न लावता त्या गाईच्या शेणाने, पठारावरील पांढऱ्या मातीने सारवल्या आहेत. जमिनीवर ही फरशी न घालता त्या देशी गाईच्या शेणाने सारवलेल्या आहेत. तर काही ठिकाणी आधुनिक साधनांचा वापर करून बांधलेली घरे पर्यटकांना आकर्षित करत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील कृषी पर्यटन केंद्रचालकांना एकत्रीत करून अॅग्रो टूरीझम असोसिएशन ऑफ कोल्हापूर या संस्थेच्या उभारणीचे काम सुरू आहे, हे पुढंच पाऊल म्हणता येईल.
सर्वोत्कृष्ट कृषी पर्यटन केंद्र
जिल्ह्यातील कृषी पर्यटनवाढीसाठी उल्लेखनीय काम करणाऱ्या सुखदेव गिरी संचलित देवगिरी फार्म कृषी पर्यटन केंद्रास राज्य शासनाच्या पर्यटन संचालनालयाचा ‘उत्कृष्ट कृषी पर्यटन केंद्र’ पुरस्कार मिळाला आहे. १६ मे २०२२ या जागतिक कृषी पर्यटन दिनादिवशी मुंबईत या पुरस्काराचे वितरण झाले. हा पुरस्कार मिळणारे देवगिरी फार्म हे जिल्ह्यातील पहिलेच कृषी पर्यटन केंद्र असून राज्यातील ९ कृषी केद्रांना पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
उल्लेखनीय उपक्रम
कृषी पर्यटन क्षेत्रातील धोरणामुळे शहरी पर्यटकांना शेतीची प्रत्यक्ष भेटीतून माहिती, शेतकऱ्यांच्या जीवनाचे दर्शन, ग्रामीण संस्कृतीशी ओळख असा अनुभवांचा ठेवा मिळतो. शेतीची कामे कशी चालतात त्याचा स्वतः अनुभव घेऊन निसर्गाशी मैत्री करण्याची संधी तसेच निरामय आयुष्य जगण्याची प्रेरणा मिळते. कृषी पर्यटन विकास हे करिअरचे अनोखे क्षेत्र ठरत आहे. शहरांमध्ये वाढणाऱ्या आजच्या पिढीची नाळ ग्रामीण भागाशी पुन्हा जोडता यावी आणि ग्रामीण भागातील आणि शेतीमधील विविधतेची त्यांना
माहिती व्हावी यादृष्टीने कृषी पर्यटन धोरणाचा मोठा लाभ होत आहे.
स्थानिकांना रोजगार
कृषी पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार मिळाला आहे. स्थानिकांनी उत्पादित केलेल्या मालाला पर्यटकांकडून मागणी वाढ आहे. डोंगराळ आणि दुर्गम भागातील वाडी – वस्तीवरील महिलांनी तयार केलेल्या आणि हातावर शिवलेल्या गोधड्या देवगिरी फार्मच्या माध्यमातून पर्यटकांना विकून स्थानिक महिलांचा आर्थिक सोर्स वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे. कृषी, ग्रामीण अर्थकारणाला गती मिळत आहे.
- अभिजित गोसावी
शेतकऱ्यांच्या माहितीस्तव साप्ताहिक कृषकोन्नती वरून साभार
शेतीला एक फायदेशीर व भरवशाचा जोडधंदा: शेतमाल प्रक्रिया उद्योग
3 thoughts on “कृषी पर्यटनातून शेतीला जोडव्यवसाय/जोडधंदा”